🌹 *गुरु* 🌹
*बारा प्रकारचे गुरु*
--------------------
पांडवप्रतापाच्या पांचव्या अध्यायांत पुढें दिल्याप्रमाणें बारा प्रकारचे गुरु आहेत --
*१ . धातुर्वादीगुरुः*
शिष्याकडून तीर्थाटन करवून नाना साधनें सांगून शेवटीं ज्ञानप्राप्ती करून देतो .
*२ . चंदनगुरुः*
चंदनवृक्ष जसा आपल्या जवळच्या वृक्षांना आपल्यासारखाच चंदन बनवितो . पण ( पण हिंगणवेळू व केळें हे वृक्ष सोडून ) तसा अभक्त दूर करून आपल्या केवल समागमानेंच हा गुरु भक्तांस तारून नेतो .
*३ . विचारगुरुः*
नित्यानित्यविचारानें शिष्यास ज्ञान करून देऊन पिपीलिकार्मानें साक्षात्कार करून देतो .
*४ . अनुग्रहगुरुः*
शिष्यावर कृपानुग्रह करतो . त्याच्या प्रतापानेंच सायास न होतां शिष्यास ज्ञान होतें .
*५ . परीसगुरुः*
परीस ज्याप्रमाणें स्पर्शमात्रेंकरून लोहाचे सुवर्ण बनवितो त्याप्रमाणें स्पर्शानें शिष्यास गुरुत्व प्राप्त होतें .
*६ . कच्छपगुरुः*
कूर्म म्हणजे कासवी ज्याप्रमाणें नुसत्या अवलोकनानें पिलांचें पोषण करिते , त्याप्रमाणें हा कृपावलोकनानेंच शिष्याचा उद्धार करतो .
*७ . चंद्रगुरुः*
चंद्र उदय पावतांच चंद्रकांतास पाझर फुटतो , त्याप्रमाणें याचें अंतर द्रवतांच दूरचे शिष्यही तरतात .
*८ . दर्पणगुरुः*
आरशांत पाहिल्याबरोबर आपलें मुख आपणांस दिसतें . त्याप्रमाणें त्याच्या नुसत्या दर्शनानें स्वरूपज्ञान होतें . कसलेच आयास पडत नाहींत .
*९ . छायानिधिगुरुः*
छायानिधि या नांवाचा एक मोठा पक्षी आकाशांत फिरत असतो . त्याची छाया ज्याच्यावर पडते तो राजा होतो . त्याप्रमाणें ह्या गुरूची छाया ज्याच्यावर पडते तो तत्काळ स्वानंद साम्राज्याधिपति होतो .
*१० . नादनिधिगुरुः*
नादनिधि नांवाचा मणि आहे . ज्या धातूचा घ्वनि त्याच्या कानांत पडतो त्या सर्व धातू स्वस्थानीं सुवर्ण बनतात . त्याप्रमाणें मुमुक्षूची करुणवाणी त्याच्या कानीं पडतांच मुमुक्षूस दिव्य ज्ञान होतें .
*११ . क्रौंचपक्षीगुरु*
क्रौंच नांवाची पक्षीण समुद्रतीरीं पिलें ठेवून चारा घेण्यासाठीं सहासहा महिने दूरदेशीं फिरावयास जाते आणि वारंवार आकाशाकडे डोळे करून पिलांची आठवण करते . त्या योगानें तेथें पिलें पुष्ट होतात . त्याचप्रमाणें हा गुरु ज्यांची आठवण करितो ते आपापल्या स्थानीं असतांच तरून जातात .
*१२ . सूर्यकांतगुरुः*
सूर्यदर्शनानें सूर्यकांत मण्यांत अथवा भिंगांत अग्नी पडतो व खालीं घरलेला कापूस जळून जातो . ( सूर्याची इच्छा नसतांनाहीं ) त्याप्रमाणे ह्या गुरूची दृष्टि जिकडे झळकते ते पुरुष तात्काळ विदेहत्व पावतात . रुद्रयामलांत सांगितलें आहे कीं , ग्रंथवाचनानेंच व गुरुप्राप्तीशिवाय जपतपादि साधनें केलीं तर त्यांच्या विशेष उपयोग होणार नाहीं . अधिकारी गुरूशिवाय इष्टदेवता साधन प्राप्त होणार नाहीं . गुरुतंत्रांत सांगितलें आहे कीं ," शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन । तस्मात् शुद्धमना नित्यं तमेवाराधयेत् गुरुं " श्रीसमर्थ रामदासस्वामींनीं नवविधा भक्तीचें वर्णन करितांना अर्चन व पादसेवन गुरूचेंच करावें असें सांगितलें आहे . त्याचें रहस्य हेंच होय .

No comments:
Post a Comment